खालील उतारा वाचा किंवा ऐका
23:32आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. 33आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. 34नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे! 36शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. 37आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”
38त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
39तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! 40पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” 42नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” 43येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
येशूचा मृत्यू
44त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला. 47जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.” 48हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
येशूची उत्तरक्रिया
50तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता. 51त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. 54तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता. 55गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.
काही क्षण काढून गोष्ट आपल्या शब्दांत पुन्हा सांगा. तुम्हाला ती मोठ्याने बोलायची किंवा लिहून काढायची इच्छा होऊ शकते. जर तुम्हाला ती आठवण्यात अडचण येत असेल, तर ती पुन्हा वाचा किंवा ऐका.
जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही कथेशी परिचित आहात, तेव्हा खालील प्रश्नांवर विचार करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी काही वेळ घ्या.
Get Discovery Bible Studies on your phone
Discover copyright ©2015-2025 discoverapp.org
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.