
खालील उतारा वाचा किंवा ऐका
15:11मग येशू म्हणाला, “एका मनुष्यास दोन पुत्र होते. 12त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. 13त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. 14त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. 15त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. 16तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. 17नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! 18आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. 19तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या. 20मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. 21मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही. 22परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! 24कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले. 25यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26त्याने एका नोकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे? 27तो नोकर त्यास म्हणाला, तुमचा भाऊ आला आहे. तो तुमच्या पित्याला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे. 28तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला. 29परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा दिले नाही. 30आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. 31तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”
काही क्षण काढून गोष्ट आपल्या शब्दांत पुन्हा सांगा. तुम्हाला ती मोठ्याने बोलायची किंवा लिहून काढायची इच्छा होऊ शकते. जर तुम्हाला ती आठवण्यात अडचण येत असेल, तर ती पुन्हा वाचा किंवा ऐका.
जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही कथेशी परिचित आहात, तेव्हा खालील प्रश्नांवर विचार करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी काही वेळ घ्या.
Get Discovery Bible Studies on your phone
Discover copyright ©2015-2026 discoverapp.org
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.