शोधा

अभ्यास ४

मनुष्याचा पतन: नोहाचा महापूर

उत्पत्ति 6:1-9:17

पायरी १: गोष्ट वाचा

खालील उतारा वाचा किंवा ऐका

x1.0

6:1पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या, 2तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. 3परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.”

4त्या दिवसात आणि त्यानंतरही, महाकाय मानव पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच.

5पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. 6म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला.

7म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.” 8परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली.

नोहा आणि तारू

9या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला 10नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन पुत्र होते.

11देवाच्या समक्षतेत पृथ्वी भ्रष्ट झालेली होती, आणि हिंसाचाराने भरलेली होती. 12देवाने पृथ्वी पाहिली; आणि पाहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता.

तारू

13म्हणून देव नोहाला म्हणाला, “मी पाहतो की, सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आता आली आहे; कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन.” 14तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव. 15देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे.

16तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर. 17आणि ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे अशा सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. पृथ्वीवर जे सर्व आहे ते मरण पावतील.

18मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तुझ्यासोबत तुझे पुत्र, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील. 19तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी दोन-दोन तुझ्याबरोबर जिवंत ठेवण्यासाठी तुझ्याबरोबर तू तारवात ने; ते नर व मादी असावेत.

20पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, आणि मोठ्या पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. 21तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.” 22नोहाने हे सर्व केले. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्वकाही केले.

7:1नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस. 2प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे. 3आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील.

4आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.” 5परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.

6जलप्रलय आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. 7नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले.

8पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही, 9देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले. 10मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.

11नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले. त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या. 12पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता.

13त्याच दिवशी नोहा आणि त्याची मुले शेम, हाम आणि याफेथ आणि नोहाची पत्नी व त्यांच्या बरोबर त्याच्या मुलांच्या तीन बायकांनीही तारवात प्रवेश केला. 14त्यांच्याबरोबर प्रत्येक रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे आणि पृथ्वीवर रांगणारी प्रत्येक गोष्ट तिच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, आणि प्रत्येक पक्षी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, प्रत्येक प्रकारचा पंख असलेला प्राणी, यांनी तारवात प्रवेश केला.

15ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला. 16देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले.

17मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले. 18मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले.

19पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले; 20पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले.

21पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपशू, थव्याने राहणारे प्राणी, आणि सर्व मानवजात मरून गेले. 22ज्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता असे, कोरड्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले.

23अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले. 24एकशे पन्नास दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता.

8:1देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली. 2पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला. 3पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले.

4सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले. 5दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले.

6चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली 7त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला.

8नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले, 9परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले.

10तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; 11ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले. 12नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही.

13असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता. 14दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती.

15देव नोहाला म्हणाला, 16“तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये. 17तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत.”

18तेव्हा नोहा, त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यांच्यासह तारवातून बाहेर आला; 19त्याच्या बरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव, आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले.

20नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशुंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. 21परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, “मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही. 22जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”

9:1नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, “फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका. 2पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत. 3प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे. 4पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये. 5परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन. 6जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. 7तुम्ही मात्र फलदायी आणि बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वीवर विस्तारा, आणि तिच्यावर बहुगुणित व्हा.” 8मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, 9“माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो, 10आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो. 11अशा प्रकारे मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत व पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही.” 12देव म्हणाला, “मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे. 13मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे. 14मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हास ढगात मेघधनुष्य दिसेल, 15नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. 16मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.” 17नंतर देव नोहाला म्हणाला, “हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.”

पायरी २: गोष्ट पुन्हा सांगा

काही क्षण काढून गोष्ट आपल्या शब्दांत पुन्हा सांगा. तुम्हाला ती मोठ्याने बोलायची किंवा लिहून काढायची इच्छा होऊ शकते. जर तुम्हाला ती आठवण्यात अडचण येत असेल, तर ती पुन्हा वाचा किंवा ऐका.

पायरी ३: गोष्ट शोधा

जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही कथेशी परिचित आहात, तेव्हा खालील प्रश्नांवर विचार करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी काही वेळ घ्या.


Get it on Google Play
Download on the App Store

Get Discovery Bible Studies on your phone

Discover copyright ©2015-2025 discoverapp.org

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.