
खालील उतारा वाचा किंवा ऐका
12:1आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. 2मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील, 3जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.” 4परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे त्याने केले, तो गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. त्याने हारान सोडले त्या वेळी अब्राम पंचाहत्तर वर्षांचा होता. 5अब्रामाने त्याची पत्नी साराय, त्याच्या भावाचा मुलगा लोट आणि हारान प्रदेशामध्ये त्यांनी जमा केलेली सर्व मालमत्ता, आणि हारानात विकत घेतलेले लोक या सर्वांना बरोबर घेतले. ते कनान देशात जाण्यासाठी निघाले आणि कनान देशात आले. 6अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. 7परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली. 8मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.
15:1या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.” 2अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?” 3अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.” 4नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.” 5मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.” 6त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.
काही क्षण काढून गोष्ट आपल्या शब्दांत पुन्हा सांगा. तुम्हाला ती मोठ्याने बोलायची किंवा लिहून काढायची इच्छा होऊ शकते. जर तुम्हाला ती आठवण्यात अडचण येत असेल, तर ती पुन्हा वाचा किंवा ऐका.
जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही कथेशी परिचित आहात, तेव्हा खालील प्रश्नांवर विचार करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी काही वेळ घ्या.
Get Discovery Bible Studies on your phone
Discover copyright ©2015-2026 discoverapp.org
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.